Tuesday 4 June 2024

शालेय प्रवास आणि दुसरी इनिंग

शालेय प्रवास आणि दुसरी इनिंग
“या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला,
हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला”.
लहानपणापासून पप्पा नेहमी सांगतात, क्रिकेट आणि जीवन याचा खूपच जवळचा संबंध असतो. मग ते मला वरील सुनील गावस्करकरचे गाणे ऐकून दाखवत. लहानपणी हे गाणे येवढे जवळचे वाटायचे नाही. पण जसं जसं वय वाढत जाते मग गाण्याचा भावार्थ समजत जातो. क्रिकेट हा असा खेळ आहे जो दोन इनिंगची संधी देतो, ज्या मध्ये तुम्ही पहिल्या इनिंग मध्ये जरी शून्यावर वर आउट झाला तरी तुम्ही दुसऱ्या इनिंगला शतक मारू शकतात किंवा पहिल्या इनिंगला शंभर मारून सुद्धा दुसऱ्या इनिंगला भोपळा पण फोडू शकत नाही. यातच जीवनाचे सार येते. कधी कुठल्यातरी परिस्थितीमुळे आपल्याला संधीचे सोने करता येत नाही, तर काही गोष्टी मागेच सोडून दयाव्या लागतात. मग पुन्हा एक इनिंग खेळायला मिळते तुम्हाला. मला मिळाली पण ती सुद्धा ३१ वर्षांनी. ती असते, प्राथमिक शाळेचे सुवर्ण महोत्सवी वर्ष. जेव्हा दुसरी संधी मिळते ती सढळहस्ते घ्यायची असते, मग विचार करायचा नसतो की ती महाग आहे, दूर आहे, कसे जमणार, करू शकतो का वगैरे वगैरे.
जेव्हा आम्ही विरारवरून मीरा रोड ला शिफ्ट झालो तेव्हा माझ्या पाचवीचा निकाल लागून सहावीत जाणार होतो. तेव्हा मला स्वतःला कल्पना देखील नव्हती की माझ्या प्राथमिक शाळेतल्या मित्रांना पुढील तीन दशके भेटता येणार नाही. पण देवयोगाने आणि कुणालच्या कृपेने २०२३ च्या जानेवारी महिन्यात तो योग आलाच. तो सोहळा खूपच भावनिक असला तरी तो आम्हा प्रत्येकाच्या मनावर कोरला गेला आहे. सर्व शिक्षकांना भेटता आले. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर मी खरंच विचार केला नव्हता की परत या सर्वांना भेटू शकेन आणि परत तोच बाँड निर्माण होईल जसा ३२ वर्षापूर्वी होता, प्राथमिक शाळेत, निस्वार्थ. जेव्हा दोन व्यक्ती काही कारणांनी दूर जातात आणि परत जेव्हा भेटतात, तेव्हा त्या लगेच कनेक्ट होत नाही. मग त्यांचे संभाषण खूपच फॉर्मल होऊन जाते. पण जर त्या दोघांमध्ये एक जरी सामाईक गोष्ट असेल तर सगळी आठवणीची टाइमलाइन उघडत जाते मग गप्पा काही संपायच्या थांबत नाही. खरे सांगायचे झाले तर आमच्या पहिली ते चौथीच्या शाळेच्या आठवणी धूसर होत चालल्या आहेत, पण प्रत्येकजण स्वतःच्या आठवणीचा पेटरा उघडत जातो मग दुसऱ्याला त्या गोष्टीवरून स्वतःची गोष्ट आठवत जाते.. आमच्या पिढी कडे शाळेतल्या सेल्फी नाहीत किंवा कळपातले फोटो देखील नाहीत. असतील तर शाळेच्या गैदरिंग चे काही फोटो. ग्रीटिंग कार्ड सुद्धा नाही. (माझी दुसरीत असणारी मुलगी दर महिन्याला एवरेज २ ग्रीटिंग कार्ड बनवत असते आणि देत सुद्धा असते. त्यासाठी तिला कुठल्या सणाचे किंवा वाढदिवसाचे प्रयोजन लागत नाही. मला आधी वैताग यायचा किती कागद फुकट घालवले म्हणून. पण आता नाही. ३०/४० वर्षा नंतर याच सुंदर आठवणी तयार होतील)
परत मागच्या महिन्यात, इंडिया ट्रिपमध्ये, या सर्व मित्रांना भेटण्याचा योग आला. भेटण्याचे ठिकाण विरार ठरवले आणि निवांत गप्पा झाल्या. सुरवातीला वाटले आज काही जास्त मित्र नाही भेटत. पण जसं जसे एक एक जण ऐड होत गेला तसे तो त्याच्या क्लोज़्ड काँटॅक्ट मधल्या मित्राला कॉल लावायचा मग भावनिक आवाहन करायचा. मग तोच,फोनच्या विरुद्ध बाजूला असणारा मित्र, दुसऱ्या मिनिटाला समोर हजर 😃 गप्पा येवढ्या वाढल्या की मला विरार- चर्चगेट लास्ट लोकल मिळेल की नाही याची जाणीव खूपच उशिरा झाली. सगळ्या आठवणींची पारायने झाली, मग तो शाळेचा घरापासून प्रवास असुदे किंवा शाळेमध्ये आणि बाहेर मिळणाऱ्या खाण्याच्या गोष्टी. तसे पण खिशात पैसे नसायचे. आमची आईवडिलांची पिढी ही बहुतेक पहिली पिढीच जी स्थलांतरीत असेल मुंबई मध्येच, किंवा ठाणे मध्ये. त्याकाळी मुंबईत घर घेणे जमत नाही म्हणून पार डोंबिवली, विरार, अंबरनाथ या “गावी” स्थिरावरणारी. त्यामुळे सगळीच काटकसर. तेव्हा तिसरीपर्यंत पाटी वर शिक्षण आणि गृहपाठ सुद्धा. प्रत्येक पिढीचा संघर्ष वेगळा वेगळा असतो. लहानपणी विपरीत स्थिती असून सुद्धा आम्ही सर्व शाळकरी मित्र या मुक्कामी वर पोहचलो आहोत ते बघून आमच्या शिक्षकांना आणि आई वडिलांना आनंद नक्कीच होत असेल.
त्यावेळी शाळेत येणे जाणे म्हणजे सुध्दा एक कसरत होती हे जर आज सांगितले कुणाला पटेलच असे नाही. प्रवासाच्या दृष्टीने विरार आणि भायंदर च्या दोन्ही शाळा माझ्यासाठी पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुव टोकासारख्या होत्या. त्याकाळी विरार एक सुंदर गाव असल्याने आणि आम्ही चाळीत राहत असल्याने एका लहान मुलाला लागते तशी सपोर्ट सिस्टम जबरदस्त होती. खेळायला भरपूर मुले, मैदान, आणि तावडे, परांजपे, पांढरे, भोळे, पाटील सारखे उत्तम शेजारी असल्यामुळे विरारची शाळा घरापासून लांब असली तरी दगदग, एकटेपणा, असुरक्षितपणा नव्हता. पहिली ते चौथीची शाळा दुपारची असल्यामुळे आणि आई-वडील कामानिमित्त सकाळीच बाहेर पडत असल्याने, तावडे आजी कडे राहून गरम स्वादिष्ट जेवणाची सवय होती. मग नंतर पाचवीला दुपारी शाळेतून आल्यावर तावडे आजीकडे गरम जेवण रेडी असायचे.( त्याकाळी नर्सरी/डे केअर अश्या कन्सेप्ट नव्हत्या. आमच्या शेजारी, तावडे आज्जी म्हणजे सबकुच. त्या आम्हाला सांभाळण्याबरोबरच, स्वादिष्ट कोकणी स्टाइलने जेवण आणि गोडी डाळ सुंदर बनवायच्या आणि मी त्यावेळी पक्का मांसाहारी असून सुद्धा त्या डाळीची अधाशासारखी वाट बघायचो. त्या डाळीची चव विरार सोडल्यानंतर आयुष्यात परत कधीच मिळाली नाही). पाचवीत असताना स्वतःहून शाळेत जायची सवय होती आणि प्रवास पण वेगवेगळ्या ऋतुत सुंदर होत असे (हो, तेव्हा आजचा सारखा फक्त कडक उन्हाळा आणि लहरी पाऊस असे दोनच ऋतू नव्हते. गुलाबी थंडीत अप्रतिम असे वातावरण असे आणि आम्ही स्वेटर घालून शाळेत जात असू). वाटेमध्ये आम्ही कुणाच्या घराच्या परसातून, शेतातून जायचो. कुणाच्या बागे मधून उगाच मिरची किंवा इडलिंबू तोड, कल्पेशच्या घराखालील असलेल्या छोट्या कंपनीच्या आवारातील केसाच्या पिना उचल असे उद्योग शाळेतून परत येताना करत असू. पण मीरा रोडला शिफ्ट झाल्या नंतर या प्रवासाने ३६० डिग्री वळण घेतले.
तेव्हा मीरा रोडला फक्त स्टेशन जवळील एरिया (शांती नगर) डेव्हलप झाला होता. चाळसंस्कृती पासून फारकत घेऊन फ्लॅट संस्कृती स्वीकारणे माझ्या सारख्या सहावीच्या मुलाला तरी जबर धक्का होता. मित्र नाही, खेळायला मैदान नाही, शेजारी पण नवे. आई-वडील कामानिमित्त सकाळीच बाहेर पडायचे मग जे काही असेल घरी ते खाऊन आम्ही दोघे भाऊ शाळेसाठी बाहेर पडत असू.
आम्ही भायंदर-काशिमीरा हाईवे जवळ घर घेतले जिकडे पहिले सहा महिने आमचीच एकमेव बिल्डिंग होती, बाकी आजूबाजूला मिठाघरे आणि मँग्रोव्हसची झाडी होती. नंतर भयंकर वेगाने २०/३० बिल्डिंगची कामे सुरु झाली आणि रस्ते नसताना सुद्धा अवजड वाहनाची वाहतूक सुरू झाली. (तेव्हा टाटा डंपरची दहशत जबरदस्त होती. हे डंपर वाहन म्हणजे GTL गेम होता त्या काळी, प्रत्येक आठवड्याला हाईवेवर एक तरी अपघात ठरलेलाच असायचा). तेव्हा मोठी शाळा फक्त भाईंदरला असल्याने, १० वर्षाचा मी आणि ५ वर्षाचा भाऊ, दोघांचा प्रवास पावसाळ्यामध्ये कुळीदाच्या पिठीसारखे होणारे पिवळया कच्च्या रोड वरून सुरु झाला. ९ ते ११ मिनिटांचा वॉक होता घरापासून हायवे पर्यंत. मग बेस्ट बसची वाट बघून अजून २०/३० मिनिटांचा प्रवास होता शाळेपर्यंत. घरापासून ते शाळेचा प्रवास एक किंवा सव्वा तासाचा होत असे. माझ्या वर्गातल्या सहावी-फ बहुतेक सर्व विद्यार्थांची स्थिती तशी होती. कारण ती तुकडी ही वेगवेगळ्या स्थलांतरांची होती. कोणी मुंबई बाहेरून तर कोणी दक्षिण/मध्य मुंबईतून भायंदर, मिरारोड, काशिमीराला स्थलांतरित झाले होते. ही मुले पार होटल अजित पैलेस (दहिसर चेक नाका), काशिमीरा, सिल्वर पार्क पासून भायंदरच्या शाळेत येत होती. कित्येकदा एकपदरी रोड आणि अवजड वाहनांमुळे अपघात नित्याची बाब होती भाईंदर-काशिमीरा रोड वर. मग ट्रॅफिकजॅम आणि परत १०-२० मिनिटांची पायपीट मध्येच बसमधून उतरून. हुश्य.. सगळा वेळ आणि शक्ती प्रवासात खर्ची होत असल्यामुळे माझ्या सारख्या प्रवासी मुलांचा प्रगती आलेख सुरवातीच्या वर्षात घसरला होता. पण नंतर परिस्थिती सुधारली. ओळखी वाढून आम्ही काही जणांनी मिळून रिक्षाची सोय केली, ७-क पासून चांगले शिक्षक मिळत गेले आणि घसरलेली गाडी काही प्रमाणात रूळावर आली. आजही जेव्हा जेव्हा मेमरी लेन उघडली जाते तेव्हा मन मात्र मानत नाही की ६ आणि ११ वर्षाच्या मुलांनी हा ओबोडधोबोड प्रवास एकटा कसा केला असेल.
काहीही म्हणा आठवणींचा हा खेळ मजेशीर असतो. तुम्हांला चांगल्या आणि सुंदर आठवणी स्वतःला शोधून काढाव्या लागतात आणि खराब आठवणी मात्र आपोआप समोर येत असतात.
थैंक यू मित्रांनो माझी विरारची संध्याकाळ अविस्मरणीय केल्याबद्दल.

भारतीय क्रिकेटची पंढरी - वानखेडे, मुंबईकर क्रिकेट रसिक, हार्दिक पंड्या आणि गर्दी व्यवस्थापन

 भारतीय क्रिकेटची पंढरी - वानखेडे, मुंबईकर क्रिकेट रसिक, हार्दिक पंड्या आणि गर्दी व्यवस्थापन

हा माझा पहिला IPL चा सामना जो मी स्टेडियम मधून बघितला. आज वर पप्पांच्या आणि शिवलकर काकांच्या कृपेने भरपूर मॅचेस वानखेडे आणि ब्रॅबोर्न स्टेडियम वर बघितल्या. पण वानखेडे हे ब्रॅबोर्नच्या तुलनेने छोटे मैदान असले तरी त्याची बातच वेगळी आहे. मुंबईकर क्रिकेट रसिक आणि मुंबईकर क्रिकेटपट्टूमुळे वानखेडेकडे एक्स फॅक्टर येतो त्यामुळे हे स्टेडियम भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. हे स्टेडियम इतिहासातल्या अनेक घटनेचे साक्षीदार आहे. आजच्या दिवशी २०११ ला याच ठिकाणी भारताने दुसऱ्यांदा WC ट्रॉफी उंचावली. क्रिकेट मध्ये नव्याने घुसलेल्या गुजराती राजकारण्यांनी भारतीय क्रिकेटचा केंद्र बिंदू मुंबईवरून गुजरातला हलवण्याचा जो आटापिटा चालू केला त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. जेव्हा खेळात राजकारण आणले जाते त्याचे परिणाम काय होतात याचे पाकिस्तान क्रिकेट हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
मुंबईकर क्रिकेट रसिक हे अजब रसायन आहे. यामध्ये डहाणू ,पालघर, डोंबिवली, अंबरनाथ पासून ते दक्षिण मुंबईच्या रसिक लोकांचा समावेश आहे. उदाहरण दयाचे झाले तर पप्पा आणि शिवलकर काका यांनी मला मॅच स्टेडियम मधून कशी “बघायची”, कुठला स्टैंड किंवा व्ह्यू आणि त्यातून क्रिकेट स्टेटेजी कशी समजवून घ्यायची याचे बाळकडू मिळत गेले. पप्पा आणि काकानी एकत्र क्लब, ऑफिस (रेड बॉल) लेवल क्रिकेट दक्षिण मुंबईच्या बहुतेक सगळ्या मैदानात खेळल्यामुळे, त्यांना खेळाची आणि मैदानची अचूक माहिती असते. पप्पा त्याकाळी चर्चगेट ते विरार क्रिकेट किट घेऊन ८० आणि ९० च्या दशकात विरार फ़ास्ट ट्रेन ने प्रवास कसे करत असतील हे कोडेच आहे. रणजी असो, कांगा लीग किंवा शिवाजी पार्क, ओवल, आझाद मैदानची मॅच मुंबईकर रसिकांसाठी छोटी किंवा मोठी नसते, ते सगळ्या मॅचेस एकाच intensity ने बघतात , फॉलो करतात, स्टेडियम मध्ये जाऊन सपोर्ट देखील करतात. शिवलकर काका अजूनही या वयात, प्रकृती ठीक नसताना नुकत्याच संपलेल्या रणजीच्या फाइनलला वानखेडेवर पाचही दिवस हजेरी लावतात आणि मुंबईच्या रणजी टीमला सपोर्ट करतात. पप्पांनी ऑफिस वेळा सांभाळून ऐतिहासिक रणजी फाइनल मुंबई विरुद्ध हरियाणा १९९१ मैचचे साक्षीदार झाले. याच रसिक प्रेमामुळे गावसकर आणि सचिन यांनी अन्य मुंबईकरा क्रिकेटपट्टुप्रमाणे रणजी, कांगा किंवा क्लब क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा नसताना चुकवले नाही. सगळ्या एकत्रित परिणांमामुळे मुंबईचे क्रिकेट कल्चर develop होत गेले आणि ४२ वेळा रणजी ट्रॉफी जिंकता आली.
या IPL सीज़नला ज्याप्रकारे हार्दिक ट्रोल होतो आहे त्यामध्ये काहीच आश्यर्य नाही आहे. काल मुंबईमध्ये सामना असून फरक पडला नाही. ९० च्या दशकात रवी शास्त्री सुद्धा टुकुटुकू खेळामुळे मुंबई मध्ये मुंबईकरनानी भरपुर ट्रोल केले होते. मुंबई टीम मैनेजमेंटला captaincy चेंज अन्य चेन्नई आणि RCB संघाप्रमाणे केला नाही त्याचे परिणाम त्यांना या सीज़नला भोगावे लागणार. परंतु एक सकारात्मक बाब म्हणजे त्याच्या छोट्याश्या खेळीस मुंबईकर प्रेक्षकांनी चांगली दाद दिली आणि कुठेच ह्युर्ये उडवली नाही. त्याच्यात टैलेंट भरपूर आहे. मला वाटते जर ही गोष्ट हार्दिक ला समजून आली आणि तो ते कुठला ही माज न दाखवता, स्वतःचे तोंड न उघडता तर तो त्याच्या परफॉर्मन्सने तो सगळ्याची तोंडे बंद करू शकतो.
गौरव आणि भाचा ॐच्या सल्ल्यामुळे आम्ही अडीच तास लवकर आल्यामुळे स्टेडियम मध्ये शिरताना गर्दी अशी मिळाली नाही. परंतु मैचच्या शेवटी गर्दी मॅनेजमेंट अभावी स्टेडियम बाहेर पडताना सगळा बोऱ्या वाजला. ४०००० पेक्षा जास्त माणसे चिंचोळ्या गल्ल्यामधून बाहेर पडताना जास्तच दमछाक झाली. लहान मुले, वृद्ध, व्यंग व्यक्तीची वेगळा मार्ग नसल्यामुळे त्यांची अवस्था खराब झाली. गर्दीला शिस्त आणि मेंदू दोन्ही नसते. आपण अजूनही क्राउड मॅनेजमेंट विषय गंभीरपणे घेतलेला नाही, मग सगळे रामभरोसे झाले. मग फक्त दुर्घटना बघायची वाट बघतो. मला इंग्लंडला WC २०१९ च्या valunteer चा थोडाबहोत अनुभव असल्यामुळे सुकर प्रवेश आणि सुरक्षित बाहेर पडणे हे दोन्ही गोष्टी मैचच्या अनुभवायच्या महत्त्वाचा भाग आहेत. आशा आहे की या चांगल्या गोष्टी आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करू शकू.

कॉबल स्टोन (Cobblestone) , पेव्हर ब्लॉक कला, किल्ले आणि डंकी ( भाग ४ आणि अंतिम)

 भाग ४ आणि अंतिम

कॉबल स्टोन (Cobblestone) , पेव्हर ब्लॉक कला, किल्ले आणि डंकी
मी शाळेत असताना कला (हस्तकला/ चित्रकला वगैरे ) या विषयाचा माझा संबंध (किंवा आवड) म्हणजे जितका अनू मलिक आणि प्रीतमचा ओरिजनल संगीताशी. वास्तुशास्त्र विषय तर कॉलेजमध्ये पण नव्हता. त्यामुळे मोठे झाल्यावर सुध्दा त्यातील आवड निर्माण झाली नव्हती. परंतु जसे फिरणे वाढले, विविध देशाचे संग्रहालय, ओल्ड टाउनच्या इमारती, किल्ले आणि त्यांच्या वास्तूकला बघून शिकायला मिळाले. पोर्तुगाल ला बहुतेक गावाठिकाणी आणि ओल्ड टाउन ला कॉबल स्टोन चे रस्ते आहेत. पण त्यांनी त्यामध्ये सुद्धा कला ओतली आहे. त्यावर कोठे कोठे आकर्षक नक्षीकाम केले आहे. या फरसबंदीला (pavement) पोर्तुगाल मध्ये calçada Portuguesa म्हणतात. मुख्यत्ये हे छोटे दगड काळे आणि पांढरे यांनी बनलेले असतात. ही कला आम्ही फॅरोच्या शॉपिंग स्ट्रीटवर बघितली. या मध्ये वेगवेगळे पैटर्न, संतांच्या आकृती, गोलाकार नक्षी कोरलेल्या होत्या. परंतु तुमच्याकडे व्हील असलेली बैग किंवा लहान मुलांची बाबागाडी (pram) असेल तर तुम्हाला चांगलाच जोर लावावा लागतो ओढायला. जेव्हा आमची मुलगी तीन वर्षाची असताना तिची बाबागाडी घेऊन प्रागला (चेक रिपब्लिक) गेलो असताना खूपच दमछाक झाली होती या कॉबल स्टोन रस्त्यामुळे. जर पाऊस पडला असेल तर सांभाळून, नाही तर तुमच्या पार्श्वभागाला ओबोड धोबड साईड वॉकच्या मिलना पासून कोणीच रोखू शकणार नाही.
किल्ले
आम्ही दोन किल्ले आतून बघितले, एक तर खूपच आकाराने लहान होता पण दुसरा (Castle of Silves) आकाराने मोठा, प्रवेश फी असलेला चांगल्या स्थितीत ठेवलेला होता. ख्रिस्तपूर्व २०१ ला बांधलेल्या या किल्ल्यात चालायला खूपची मोकळी स्वच्छ जागा होती आणि बुरुजाच्या बाजूला चार पाच फुट रुंदीचा गोलाकार पुरातन साईड वॉक मजबूत स्थितीत होता. ३० मिनिटांमध्ये आमची चक्कर मारून झाली. किल्ल्यामध्ये इनफार्मेशन सेंटर, वॉशरूम आणि कॅफे होता. किल्ल्यामध्ये खोदकाम केले होते आणि मुस्लीम/ अरबी राजवटीतील अवशेष उभे केले होते. प्रत्येक अवशेषांच्या ठिकाणी दोन्ही भाषेतल्या पाट्या माहिती देण्यासाठी लावल्या होत्या. त्या अवशेषातून फिरण्यासाठी प्रशासनाने चांगला लाकडी साइड वॉक बांधून घेतला आहे. तसेच कुठेही किल्ल्याच्या भिंतींवर आणि बुरूजावर झाडे किंवा रोपटे उगवले नव्हते. याच प्रकारच्या झाडामुळे किल्ल्याच्या भिंती ठिसूळ बनतात आणि त्या टिकाव धरत नाहीत. युरोपातील किल्ल्याची व्यवस्थित डागडुजी केली जाते, कुठेही आताच्या काळातील सिमेंटचा किंवा अन्य आधुनिक सामुग्रीचा वापर बाह्य भागावर दिसून येत नाही. त्यामुळे जुन्या काळाचा फील येतो. यासाठी प्रामाणिक दृष्टिकोन लागतो. त्या साठी किल्ल्याचे प्रोफेशनल व्यवस्थापन आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक कौतुकास पात्र आहेत. तुटलेल्या पायऱ्यांवर, बुरूजावर पांढरे सीमेंट टाकून सारवासावर केलेली आपल्याला आवडेल का? किल्ल्याचा एरियल व्ह्यू चा फोटो आंतरजाळ्यात मिळाल्यास टाकतो. ऊनात फिरल्यामुळे जाम भूक लागली होती. किल्ल्या बाहेर एक मोठा कॅफे (Cafe Igles) आहे तिकडे आम्ही दुपारचे जेवण पसंत केले.
डंकी आणि देशी माणसे
डंकी म्हणजे पाठीवरच्या बॅगमध्ये मोजकेच अन्न आणि पाणी, कपडे घेऊन विविध देशाच्या सीमा पायी अनधिकृतपणे ओलांडून ईसिप्त स्थळी पोहचणे. यावर्षीच्या पॅरिस आणि पोर्तुगालच्या ट्रिप मध्ये आम्हाला देशी माणसे भरपूर दिसली फक्त पर्यटक म्हणून नाही तर अनधिकृत व्यवसाय करणारी आणि कधी अधिकृतपणे सुद्धा करणारी. कधी ते मिनरल पाण्याच्या बॉटल्स बादलीत ठेवून एक नजर पोलिसांच्या हालचालीवर ठेवून धावपळ करणारे, आयफेल टॉवरच्या चित्राच्या छत्र्या विकणारा विशीतला तरुण, आमचा बैकग्राउंडला आयफेल ठेऊन फोटो घेणारा फोटोग्राफर, आमच्या पोर्तुगालच्या रिसोर्ट मध्ये वायरिंग, प्लंबिंग, बागेतले काम करणारे, अल्बुफेरीच्या किनाऱ्यावर १२/१५ च्या घोळक्यात व्हॉलीबॉल खेळणारे सगळेजण देशी माणसे होती. मी त्यांच्या राज्याची ओळख उघड करू इच्छित नाही. बहुतेक सर्वजण डंकी करूनच युरोपात आले आहेत. ते जे काम करतात त्यात ते खुश नसतात परंतु दुसरा पर्याय नसल्याने (शिक्षित नसल्यामुळे) कमी वेतनात हलाखीच्या परिस्थितीत जगत असतात. पण तुम्ही जेव्हा त्यांच्याशी तुम्ही आपुलकीने बोलतात, तेव्हा ते धडाधड मन मोकळे करतात. परंतु या प्रकारामुळे शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांच्या व्हिसाला किंवा स्थलांतराला मर्यादा येतात आणि त्यांना जास्त फटका बसतो. मोफत दर्जेदार शिक्षण, वाजवी सर्वोत्तम मेडिकल सोयी, आणि दर्जेदार रोजगार संधी माझ्या मते जर सरकारने पुरवल्या तर या अनधिकृत स्थलांतरांचा आकडा कमी करता येईल.
अवांतर
ब्रिटिशांसाठी एप्रिल ते सप्टेंबर हा सीज़न त्यांच्या उन्हाळी सूर्य पर्यटनासाठी स्वर्गीय असतो , कारण तापमान या काळात अव्हरेज ३० डिग्रीच्या वर जाते आणि वर्षाचे जवळजवळ ३०० दिवस लख्ख सूर्यप्रकाश असतो. ऑक्टोबर ते मार्च पर्यंत सीज़न हा ऑफ पीक मानला जातो. परंतु आम्हाला हा मौसमात अलग्रेव्हला फिरायला मस्त वाटले, कारण दिवसभर १८/१९ डिग्री सेल्सिअस आणि रात्री १० पर्यंत येत होते. विरारच्या गुलाबी थंडीची आठवण झाली. मुख्य म्हणजे आम्हाला कोठेच गर्दी, गडबड किंवा पार्किंगसाठी पळापळ झाली नाही. आम्ही फक्त फारो सिटी सेंटरला पार्किंगसाठी पे केले. येथे इंग्रजी सर्वांना चांगल्यापैकी येते आणि बाकीच्या युरोपियन देशापेक्षा पोर्तुगालमध्ये दैनंदिन खर्च कमी आहे. तसेच चांगल्या आरोग्यसेवा असल्यामुळे हा प्रांत उत्तर यूएस, कॅनडा सारख्या थंड देशासाठी सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी सर्वोत्तम स्थान म्हणून जगभरात गणला जातो. आमची उत्तरेकडील पोर्तो आणि लिस्बन शहरे बघायची राहिली आहेत. आता बघू केव्हा मुहूर्त मिळतो आहे..
समाप्त.