Tuesday 4 June 2024

भारतीय क्रिकेटची पंढरी - वानखेडे, मुंबईकर क्रिकेट रसिक, हार्दिक पंड्या आणि गर्दी व्यवस्थापन

 भारतीय क्रिकेटची पंढरी - वानखेडे, मुंबईकर क्रिकेट रसिक, हार्दिक पंड्या आणि गर्दी व्यवस्थापन

हा माझा पहिला IPL चा सामना जो मी स्टेडियम मधून बघितला. आज वर पप्पांच्या आणि शिवलकर काकांच्या कृपेने भरपूर मॅचेस वानखेडे आणि ब्रॅबोर्न स्टेडियम वर बघितल्या. पण वानखेडे हे ब्रॅबोर्नच्या तुलनेने छोटे मैदान असले तरी त्याची बातच वेगळी आहे. मुंबईकर क्रिकेट रसिक आणि मुंबईकर क्रिकेटपट्टूमुळे वानखेडेकडे एक्स फॅक्टर येतो त्यामुळे हे स्टेडियम भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखले जाते. हे स्टेडियम इतिहासातल्या अनेक घटनेचे साक्षीदार आहे. आजच्या दिवशी २०११ ला याच ठिकाणी भारताने दुसऱ्यांदा WC ट्रॉफी उंचावली. क्रिकेट मध्ये नव्याने घुसलेल्या गुजराती राजकारण्यांनी भारतीय क्रिकेटचा केंद्र बिंदू मुंबईवरून गुजरातला हलवण्याचा जो आटापिटा चालू केला त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. जेव्हा खेळात राजकारण आणले जाते त्याचे परिणाम काय होतात याचे पाकिस्तान क्रिकेट हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
मुंबईकर क्रिकेट रसिक हे अजब रसायन आहे. यामध्ये डहाणू ,पालघर, डोंबिवली, अंबरनाथ पासून ते दक्षिण मुंबईच्या रसिक लोकांचा समावेश आहे. उदाहरण दयाचे झाले तर पप्पा आणि शिवलकर काका यांनी मला मॅच स्टेडियम मधून कशी “बघायची”, कुठला स्टैंड किंवा व्ह्यू आणि त्यातून क्रिकेट स्टेटेजी कशी समजवून घ्यायची याचे बाळकडू मिळत गेले. पप्पा आणि काकानी एकत्र क्लब, ऑफिस (रेड बॉल) लेवल क्रिकेट दक्षिण मुंबईच्या बहुतेक सगळ्या मैदानात खेळल्यामुळे, त्यांना खेळाची आणि मैदानची अचूक माहिती असते. पप्पा त्याकाळी चर्चगेट ते विरार क्रिकेट किट घेऊन ८० आणि ९० च्या दशकात विरार फ़ास्ट ट्रेन ने प्रवास कसे करत असतील हे कोडेच आहे. रणजी असो, कांगा लीग किंवा शिवाजी पार्क, ओवल, आझाद मैदानची मॅच मुंबईकर रसिकांसाठी छोटी किंवा मोठी नसते, ते सगळ्या मॅचेस एकाच intensity ने बघतात , फॉलो करतात, स्टेडियम मध्ये जाऊन सपोर्ट देखील करतात. शिवलकर काका अजूनही या वयात, प्रकृती ठीक नसताना नुकत्याच संपलेल्या रणजीच्या फाइनलला वानखेडेवर पाचही दिवस हजेरी लावतात आणि मुंबईच्या रणजी टीमला सपोर्ट करतात. पप्पांनी ऑफिस वेळा सांभाळून ऐतिहासिक रणजी फाइनल मुंबई विरुद्ध हरियाणा १९९१ मैचचे साक्षीदार झाले. याच रसिक प्रेमामुळे गावसकर आणि सचिन यांनी अन्य मुंबईकरा क्रिकेटपट्टुप्रमाणे रणजी, कांगा किंवा क्लब क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट दौरा नसताना चुकवले नाही. सगळ्या एकत्रित परिणांमामुळे मुंबईचे क्रिकेट कल्चर develop होत गेले आणि ४२ वेळा रणजी ट्रॉफी जिंकता आली.
या IPL सीज़नला ज्याप्रकारे हार्दिक ट्रोल होतो आहे त्यामध्ये काहीच आश्यर्य नाही आहे. काल मुंबईमध्ये सामना असून फरक पडला नाही. ९० च्या दशकात रवी शास्त्री सुद्धा टुकुटुकू खेळामुळे मुंबई मध्ये मुंबईकरनानी भरपुर ट्रोल केले होते. मुंबई टीम मैनेजमेंटला captaincy चेंज अन्य चेन्नई आणि RCB संघाप्रमाणे केला नाही त्याचे परिणाम त्यांना या सीज़नला भोगावे लागणार. परंतु एक सकारात्मक बाब म्हणजे त्याच्या छोट्याश्या खेळीस मुंबईकर प्रेक्षकांनी चांगली दाद दिली आणि कुठेच ह्युर्ये उडवली नाही. त्याच्यात टैलेंट भरपूर आहे. मला वाटते जर ही गोष्ट हार्दिक ला समजून आली आणि तो ते कुठला ही माज न दाखवता, स्वतःचे तोंड न उघडता तर तो त्याच्या परफॉर्मन्सने तो सगळ्याची तोंडे बंद करू शकतो.
गौरव आणि भाचा ॐच्या सल्ल्यामुळे आम्ही अडीच तास लवकर आल्यामुळे स्टेडियम मध्ये शिरताना गर्दी अशी मिळाली नाही. परंतु मैचच्या शेवटी गर्दी मॅनेजमेंट अभावी स्टेडियम बाहेर पडताना सगळा बोऱ्या वाजला. ४०००० पेक्षा जास्त माणसे चिंचोळ्या गल्ल्यामधून बाहेर पडताना जास्तच दमछाक झाली. लहान मुले, वृद्ध, व्यंग व्यक्तीची वेगळा मार्ग नसल्यामुळे त्यांची अवस्था खराब झाली. गर्दीला शिस्त आणि मेंदू दोन्ही नसते. आपण अजूनही क्राउड मॅनेजमेंट विषय गंभीरपणे घेतलेला नाही, मग सगळे रामभरोसे झाले. मग फक्त दुर्घटना बघायची वाट बघतो. मला इंग्लंडला WC २०१९ च्या valunteer चा थोडाबहोत अनुभव असल्यामुळे सुकर प्रवेश आणि सुरक्षित बाहेर पडणे हे दोन्ही गोष्टी मैचच्या अनुभवायच्या महत्त्वाचा भाग आहेत. आशा आहे की या चांगल्या गोष्टी आपण पुढच्या पिढीला हस्तांतरित करू शकू.

No comments:

Post a Comment