Tuesday 4 June 2024

कॉबल स्टोन (Cobblestone) , पेव्हर ब्लॉक कला, किल्ले आणि डंकी ( भाग ४ आणि अंतिम)

 भाग ४ आणि अंतिम

कॉबल स्टोन (Cobblestone) , पेव्हर ब्लॉक कला, किल्ले आणि डंकी
मी शाळेत असताना कला (हस्तकला/ चित्रकला वगैरे ) या विषयाचा माझा संबंध (किंवा आवड) म्हणजे जितका अनू मलिक आणि प्रीतमचा ओरिजनल संगीताशी. वास्तुशास्त्र विषय तर कॉलेजमध्ये पण नव्हता. त्यामुळे मोठे झाल्यावर सुध्दा त्यातील आवड निर्माण झाली नव्हती. परंतु जसे फिरणे वाढले, विविध देशाचे संग्रहालय, ओल्ड टाउनच्या इमारती, किल्ले आणि त्यांच्या वास्तूकला बघून शिकायला मिळाले. पोर्तुगाल ला बहुतेक गावाठिकाणी आणि ओल्ड टाउन ला कॉबल स्टोन चे रस्ते आहेत. पण त्यांनी त्यामध्ये सुद्धा कला ओतली आहे. त्यावर कोठे कोठे आकर्षक नक्षीकाम केले आहे. या फरसबंदीला (pavement) पोर्तुगाल मध्ये calçada Portuguesa म्हणतात. मुख्यत्ये हे छोटे दगड काळे आणि पांढरे यांनी बनलेले असतात. ही कला आम्ही फॅरोच्या शॉपिंग स्ट्रीटवर बघितली. या मध्ये वेगवेगळे पैटर्न, संतांच्या आकृती, गोलाकार नक्षी कोरलेल्या होत्या. परंतु तुमच्याकडे व्हील असलेली बैग किंवा लहान मुलांची बाबागाडी (pram) असेल तर तुम्हाला चांगलाच जोर लावावा लागतो ओढायला. जेव्हा आमची मुलगी तीन वर्षाची असताना तिची बाबागाडी घेऊन प्रागला (चेक रिपब्लिक) गेलो असताना खूपच दमछाक झाली होती या कॉबल स्टोन रस्त्यामुळे. जर पाऊस पडला असेल तर सांभाळून, नाही तर तुमच्या पार्श्वभागाला ओबोड धोबड साईड वॉकच्या मिलना पासून कोणीच रोखू शकणार नाही.
किल्ले
आम्ही दोन किल्ले आतून बघितले, एक तर खूपच आकाराने लहान होता पण दुसरा (Castle of Silves) आकाराने मोठा, प्रवेश फी असलेला चांगल्या स्थितीत ठेवलेला होता. ख्रिस्तपूर्व २०१ ला बांधलेल्या या किल्ल्यात चालायला खूपची मोकळी स्वच्छ जागा होती आणि बुरुजाच्या बाजूला चार पाच फुट रुंदीचा गोलाकार पुरातन साईड वॉक मजबूत स्थितीत होता. ३० मिनिटांमध्ये आमची चक्कर मारून झाली. किल्ल्यामध्ये इनफार्मेशन सेंटर, वॉशरूम आणि कॅफे होता. किल्ल्यामध्ये खोदकाम केले होते आणि मुस्लीम/ अरबी राजवटीतील अवशेष उभे केले होते. प्रत्येक अवशेषांच्या ठिकाणी दोन्ही भाषेतल्या पाट्या माहिती देण्यासाठी लावल्या होत्या. त्या अवशेषातून फिरण्यासाठी प्रशासनाने चांगला लाकडी साइड वॉक बांधून घेतला आहे. तसेच कुठेही किल्ल्याच्या भिंतींवर आणि बुरूजावर झाडे किंवा रोपटे उगवले नव्हते. याच प्रकारच्या झाडामुळे किल्ल्याच्या भिंती ठिसूळ बनतात आणि त्या टिकाव धरत नाहीत. युरोपातील किल्ल्याची व्यवस्थित डागडुजी केली जाते, कुठेही आताच्या काळातील सिमेंटचा किंवा अन्य आधुनिक सामुग्रीचा वापर बाह्य भागावर दिसून येत नाही. त्यामुळे जुन्या काळाचा फील येतो. यासाठी प्रामाणिक दृष्टिकोन लागतो. त्या साठी किल्ल्याचे प्रोफेशनल व्यवस्थापन आणि त्यांना पाठिंबा देणारे लोक कौतुकास पात्र आहेत. तुटलेल्या पायऱ्यांवर, बुरूजावर पांढरे सीमेंट टाकून सारवासावर केलेली आपल्याला आवडेल का? किल्ल्याचा एरियल व्ह्यू चा फोटो आंतरजाळ्यात मिळाल्यास टाकतो. ऊनात फिरल्यामुळे जाम भूक लागली होती. किल्ल्या बाहेर एक मोठा कॅफे (Cafe Igles) आहे तिकडे आम्ही दुपारचे जेवण पसंत केले.
डंकी आणि देशी माणसे
डंकी म्हणजे पाठीवरच्या बॅगमध्ये मोजकेच अन्न आणि पाणी, कपडे घेऊन विविध देशाच्या सीमा पायी अनधिकृतपणे ओलांडून ईसिप्त स्थळी पोहचणे. यावर्षीच्या पॅरिस आणि पोर्तुगालच्या ट्रिप मध्ये आम्हाला देशी माणसे भरपूर दिसली फक्त पर्यटक म्हणून नाही तर अनधिकृत व्यवसाय करणारी आणि कधी अधिकृतपणे सुद्धा करणारी. कधी ते मिनरल पाण्याच्या बॉटल्स बादलीत ठेवून एक नजर पोलिसांच्या हालचालीवर ठेवून धावपळ करणारे, आयफेल टॉवरच्या चित्राच्या छत्र्या विकणारा विशीतला तरुण, आमचा बैकग्राउंडला आयफेल ठेऊन फोटो घेणारा फोटोग्राफर, आमच्या पोर्तुगालच्या रिसोर्ट मध्ये वायरिंग, प्लंबिंग, बागेतले काम करणारे, अल्बुफेरीच्या किनाऱ्यावर १२/१५ च्या घोळक्यात व्हॉलीबॉल खेळणारे सगळेजण देशी माणसे होती. मी त्यांच्या राज्याची ओळख उघड करू इच्छित नाही. बहुतेक सर्वजण डंकी करूनच युरोपात आले आहेत. ते जे काम करतात त्यात ते खुश नसतात परंतु दुसरा पर्याय नसल्याने (शिक्षित नसल्यामुळे) कमी वेतनात हलाखीच्या परिस्थितीत जगत असतात. पण तुम्ही जेव्हा त्यांच्याशी तुम्ही आपुलकीने बोलतात, तेव्हा ते धडाधड मन मोकळे करतात. परंतु या प्रकारामुळे शिक्षित आणि उच्चशिक्षित लोकांच्या व्हिसाला किंवा स्थलांतराला मर्यादा येतात आणि त्यांना जास्त फटका बसतो. मोफत दर्जेदार शिक्षण, वाजवी सर्वोत्तम मेडिकल सोयी, आणि दर्जेदार रोजगार संधी माझ्या मते जर सरकारने पुरवल्या तर या अनधिकृत स्थलांतरांचा आकडा कमी करता येईल.
अवांतर
ब्रिटिशांसाठी एप्रिल ते सप्टेंबर हा सीज़न त्यांच्या उन्हाळी सूर्य पर्यटनासाठी स्वर्गीय असतो , कारण तापमान या काळात अव्हरेज ३० डिग्रीच्या वर जाते आणि वर्षाचे जवळजवळ ३०० दिवस लख्ख सूर्यप्रकाश असतो. ऑक्टोबर ते मार्च पर्यंत सीज़न हा ऑफ पीक मानला जातो. परंतु आम्हाला हा मौसमात अलग्रेव्हला फिरायला मस्त वाटले, कारण दिवसभर १८/१९ डिग्री सेल्सिअस आणि रात्री १० पर्यंत येत होते. विरारच्या गुलाबी थंडीची आठवण झाली. मुख्य म्हणजे आम्हाला कोठेच गर्दी, गडबड किंवा पार्किंगसाठी पळापळ झाली नाही. आम्ही फक्त फारो सिटी सेंटरला पार्किंगसाठी पे केले. येथे इंग्रजी सर्वांना चांगल्यापैकी येते आणि बाकीच्या युरोपियन देशापेक्षा पोर्तुगालमध्ये दैनंदिन खर्च कमी आहे. तसेच चांगल्या आरोग्यसेवा असल्यामुळे हा प्रांत उत्तर यूएस, कॅनडा सारख्या थंड देशासाठी सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी सर्वोत्तम स्थान म्हणून जगभरात गणला जातो. आमची उत्तरेकडील पोर्तो आणि लिस्बन शहरे बघायची राहिली आहेत. आता बघू केव्हा मुहूर्त मिळतो आहे..
समाप्त.

No comments:

Post a Comment