AI आणि सैंडविच पिढी
जसे जसे वय वाढत जाते तसे शरीर रुपी इंजिन जुने होत जाते. भोवतालील परिस्थिती आधुनिक तंत्रज्ञाने वेगात बदलत असते आणि जुन्या संकल्पना, विचार मोडत राहते. काही जण कुढत राहतात, परिस्थितीला दोष देत राहतात आणि आलेला दिवस पुढे ढकलत राहतात. पण काही जण बदल स्वीकारतात, आधुनिक तंत्रज्ञानाला आपलेसे करतात आणि वेगावर स्वार होतात.
अश्याच स्वभावाची, आयरीन, सिंगापूरला राहणारी, चिनी वंशाची, आम्हाला दिवाळीच्या सुट्टीत, ट्रॉम्सोला (नॉर्वे) भेटली. वय हे फक्त नंबर आहे, याची पुरेपूर खात्री तिच्या स्वभावावरून आणि अथक बडबडण्यावरून पटते. तसे बघायला गेले तर ट्रॉम्सो हे काही नेहमीचे पर्यटन स्थळ नाही. उत्तर ध्रुवाजवळचे चांगली लोकसंख्या असलेले, नॉर्दन लाइट्सची राजधानी असा लौकिक असलेले आणि पृथ्वी च्या आर्टिक सर्कल मधले शहर. आता ऑक्टोबर/नोव्हेंबर मध्ये तापमान शून्याच्या वर जात नाही, मुसळधार, धुवांधार हे शब्द फिके वाटतील असा बर्फाचा मौसम चालू होण्याचा काळ. रात्रीची निवांत झोप आणि स्पॅनिश ऊनाची सवय असलेल्या माझ्यासारख्याला हे बर्फाळ पर्यटन लहान मुली बरोबर झेपणार नाही अशी खात्री असलेल्याने मी बायको ला महिनाभर नॉर्वे ट्रिप साठी नकार देत राहिलो. पण यावेळी चक्क बायकोने पर्यटन स्थळाचा (नॉर्वे) होम वर्क जबरदस्त केल्याने मग मी नेहमीप्रमाणे मान तुकवली. आणि ही पन्नाशी पार, पेन्शनर, सर्वात महागड्या देशात, एकटी बुजुर्ग महिला अश्या ठिकाणी येते म्हणजे एक वेळ पुजारा ५० बॉल मध्ये २०-२० मध्ये शतक मारू शकतो यावर विश्वास बसेल पण त्यावर नाही.
दिवाळीच्या आदल्या दिवशी आमची आणि तिची जुजबी ओळख, AirBnB घरात झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या पहिल्या आंघोळीच्या दिवशी बायकोमध्ये यश चोप्राचे भूत शिरले की भुलभुलैयाची मंजुलीका शिरली काय कुणास ठाऊक, बर्फा मध्ये तिला साडी घालायची हुक्की आली आणि मला पारंपरिक कुर्ता घालायचा आदेश. आयरीनने आमचे घराबाहेरील बर्फातले फोटो सेशन तिने तिच्या रूम मधून बघितले आणि आम्हाला तिघांचे एकत्र फोटो काढायला बाहेर पण आली. आम्ही भाड्याची कार एयरपोर्ट वरून घेतली होती. आदल्या रात्रीपासून जबरदस्त स्नो पडत असल्यामुळे मी कार बाहेर काढण्याची हिंमत केली (शक्यतो सीझनचा पहिला बर्फ किंवा अर्धवट गोठलेल्या पारदर्शक बर्फावर गाडी चालवण्याची रिस्क घेऊ नये. धुवांधार बर्फाच्या चादरीसदृश्य रस्त्यावर तेवढी रिस्क नाही.) मग तिने विनंती केली सिटी सेंटर/ टाउन पर्यंत सोडण्यासाठी. तिथपासून ज्या गप्पा रंगल्या (जसे जुनी ओळख किंवा खूप दिवसांनी मित्र/मैत्रीण भेटल्यासारख्या) त्या टाउन च्या भुयारी पार्किंग स्लॉट पर्यंत. त्या दिवशी घरी परत जाताना आमच्या साठी तिने काही फळे आणली.
साठीच्या आसपास असणारी, स्पष्ट उच्चारचे इंग्रजी बोलणारी, लग्नाच्या बंधनातून लवकर विभक्त झालेली, पण मुलीचा लंडन मधील शिक्षणाचा खर्च नवरा आणि तिने वाटून घेतला हे सांगताना न संकोचणारी अशी ती. आता कमवत्या अविवाहित मुलीकडे लंडनला न राहता, मध्य लंडनला airbnb मध्ये थोडे दिवस आणि मग काही दिवस युरोप मधल्या ठराविक ठिकाणी एकटीच फिरण्याची हौस भागविणे हा तिचा गेल्या काही वर्षाचा क्रम. एक एक बकेट लिस्ट पूर्ण करायचा तिला ध्यास. म्हणून लवकर स्वेछ्यानिवृत्ती घेऊन, आयुष्यभर गुंतवणूक केलेले पैसे ट्रिप साठी टप्प्या टप्प्याने कसे वापरावे याचेही मार्गदर्शन केले. आताचे ठिकाण तिने चक्क चैट जीपीटी मधून शोधले. तर कसे, प्रश्न विचारून AI ला- नॉर्दर्न लाइट्स साठीचे सर्वोत्तम ठिकाण कुठले? मग airbnb च्या साइट वरून ट्रॉम्सोमधील लाइट्स साठी चांगली राहण्याची जागा सुद्धा शोधून काढली आणि नऊ दिवसांसाठी बुक पण करून टाकली. मौसमाच्या पहिल्याच धुवांधार बर्फात एयरपोर्ट वरून लोकल बस पकडली. मग बॅग घेऊन अंधारात बस स्टॉप पासून एक किलोमीटर लांब असलेल्या airbnb च्या घरापर्यंत बर्फ तुडवत पोहचली. साधे स्पोर्टशूज बर्फात घातल्यामुळे घराजवळ घसरून पडली, पण सुदैवाने काही लागले नाही. एवढा प्रवास आणि त्रास सहन करून सुद्धा रात्री घराबाहेर पडली कारण नॉर्दर्न लाइट्स साठी. तिने आम्हाला साडी आणि पारंपरिक कपडे का घातले हे विचारले. मी अनोखळी लोकं सोबत जास्त ओपनअप होत नाही आणि त्रोटकच माहिती देतो म्हणून तिला सहज म्हटले की आमचा आज सण आहे आणि हिंदी चित्रपटांचा परिणाम. “आज ‘दीपावली’ आहे ना? ऑक्टोबर मध्ये असतो ना हा भारतीय सण?” असे बोलून तिने माझी आणि बायकोची विकेट काढली. तिने ‘दिवाळी’ असे न म्हणता ‘दीपावली’ असा स्पष्ट उच्चार करून ती वेगळेच रसायन आहे याची प्रचिती आली.
दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे एयरपोर्टसाठी निघताना ती दुरून कुठून तरी फिरून आली आणि घराजवळ दोन रेनडियर दिसल्यामुळे जबरदस्त आनंदात होती. ती नऊ दिवसानंतर लंडनला परत येणार होती, आपण परत भेटू लंडनला सांगून ग्रीट करून रूम मध्ये गेली. आता हिची आणि आपली कुठे भेट होणार असे वाटून गेले. ओस्लो ला जाणारी फ्लाइट सकाळी असल्यामुळे आमची चेकआउटच्या घाईमुळे आम्ही मुलीची सॅक तिकडेच विसरलो. त्या मध्ये तिची पुस्तके आणि ड्रॉइंगचे पुस्तक होते (जे आम्ही विमानप्रवास वापरतो जेणे करून मोबाईल किंवा टीव्ही पासून मुलीला दूर ठेवता येईल) . एयरपोर्ट असताना आम्हाला सॅक ची आठवण आली आणि आम्ही कपाळावर हात मारला. सॅक मधले सामान जास्त किमतीचे नव्हते परंतु ती सॅक मुलीला गिफ्ट म्हणून मिळाली होती. सॅक आणि सामानावर पाणी सोडावे का या विचारात असताना मग मात्र तिची आठवण आली. तिला विनंती केली की जर घरी बैग राहिली असेल तर तुला सॅक रिटर्न करायला जमेल का लंडनमध्ये . तसे बघायला गेले तर इंग्लंड च्या आमच्या घरापासून ते लंडन ला ट्रेनच्या प्रवासाची किंमती मध्ये अश्या ४/५ बॅग्स सहज येतील. पण मुलीच्या हट्टा पाई कोणाचे काही चालले आहे का? पण ती पटकन तयार सुद्धा झाली. सुदैवाने सॅक घरीच राहिल्याने आणि मालकाने तिला दिली .
परत तिला भेटायला आणि बैग परत घ्यायला मी परत लंडन गाठले. तिला विचारले मुलीला भेटलीस का? पण मुलगी बॉयफ्रेंड बरोबर यूएस ला गेली असल्यामुळे ती आता भेटणार नाही आता परत कधी भेटेल याची गॅरंटी नाही असे हसून बोलली. मी आता हिवाळ्यात युरोप ला नाही येणार पण उन्हाळ्यात मात्र येईन पण दोन वर्षाने, तो पर्यंत पैसे साठवेन पुढच्या ट्रिप साठी. पण ती सिंगापूरला येईल ना पुढच्या महिन्यात ख्रिसमस मध्ये? मी न राहून विचारले. नाही, ती स्वीस ला बॉयफ्रेंडच्या मूळ घरी जाईल ख्रिसमस साजरा करायला. असे ती म्हणताना तिचा चेहरा कितीही हसरा ठेवण्याचा प्रयत्न करत असला तरी दुःख लपवू शकत नव्हता. ती पुढे बोलत राहिली. मी काही टिपिकल मम्मी नाही आहे. सिंगापूर खूपच छोटा देश आहे आणि इकडे युरोप किंवा लंडन ला जॉबच्या संधी जास्त आहेत. जिकडे तिला राहवसे वाटते तिकडे तिने राहावे, मी काही अडवत नाही की विचारत नाही. तिला माझ्या बरोबर फिरायला आवडत नाही. मग मी एकटीच फिरते. मला ही कधी कधी वाटते कुणी तरी असले की ती व्यक्ती कार चालवेल मग भरपूर ठिकाणे बघता येतील. कुणीच बरोबर नसल्यामुळे मी एकाच ठिकाणी जास्त मुक्काम करते आणि airbnb शोधते, जेणे करून हळू हळू मला सवडीने गोष्टी बघता येतील आणि जेवण बनवून खाता येईल, बाहेरील जेवणाचे पैसे वाचावता येतील. मला साधी कॉफी साध्या रेस्टॉरंट्स मधली पण चालते, पण यांना कोस्टा किंवा स्टारबक्स ची हवी. पण तिला सांगेन चिनी नवीन वर्षाला तरी ये, नातेवाईक यांना एकदा तरी भेट. बघू कसे जमते ते. पण तुम्ही दोघांनी दुसऱ्या बाळाचा पण विचार करा, मुलांना भावंडे हवी हे माझ्या अनुभवावरून सांगते.
एक गोष्ट मान्य करायला हवी. या साठीच्या पुढच्या पिढीला मी सँडविच पिढी म्हणतो. यांचे सुरुवातीचे बालपणीचे आयुष्य शिक्षण मिळवण्यासाठी झगडण्यात गेले, नंतर दुसऱ्यांच्या घरी राहून नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष मग लग्नानंतर सासू सासरे आणि नातेवाईक काय म्हणतील याचे दडपण, मग रिटायर लाइफ मध्ये कुणीतरी सोबती साठी पाठशिवणीचा खेळ. आयरीन सारखी माणसे भेटायला हवीत वारंवार , जी जगण्याचा अर्थ शोधणारी, विपरीत परिस्थितीत ध्रुव तारा बनून दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारी. "नॉर्दर्न लाइट्स" (उत्तर ध्रुवीय प्रकाश) अनिश्चित असतात. आपण त्यासाठी तयारी करू शकतो आणि त्यांची वाट पाहू शकतो, पाहण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागतो, थंडीत वाट पाहावी लागते आणि रात्री जागरण करावे लागते परंतु ते दिसतील याची खात्री कधीच नसते. अशी माणसे नॉर्दन लाइट्स सारखी असतात, हे आपल्याला शिकवतात की आयुष्यातील अनिश्चिततेला स्वीकारावे आणि केवळ गंतव्यस्थानाचा आनंद न घेता प्रवासाचा आनंदही लुटावा.
मला आशा आहे ती आणि तिची मुलगी चीनी नवीन वर्षाचे स्वागत करायला एकत्र असतील, आमेन.